top of page
Writer's pictureMahannewsonline

नववर्षाच्या सुरुवातीलाच दुर्दैवी घटना; वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी वैष्णोदेवी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक पोहोचलचे होते. पहाटे २:४५ च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेनंतर वैष्णोदेवीची यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे अनेक भाविकांना दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.



bottom of page