top of page
Writer's pictureMahannewsonline

वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर : अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना कार्यक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांच्या पाऊल खुणा नोंदविण्याच्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या दिवशीच महिला वनरक्षकावर वाघिणीने हल्ला केला. त्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक ९७ मध्ये शनिवारी घडली. स्वाती एन. ढुमणे (४३) असे मृत महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाला पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित देण्यात आली आहे.

स्वाती ढुमणे यांनी कोलारा बीट येथे ३ सहायकांसह सकाळी ७ च्या सुमारास मांसभक्षी व मोठ्या तृणभक्षी प्राण्यांच्या पाऊलखुणांचे सर्वेक्षण सुरू केले होते. कोलारा गेटपासून कंपार्टमेंट क्रमांक ९७ पर्यंत सुमारे ४ कि.मी. पायी चालत गेल्यावर त्यांना सुमारे २०० मीटर अंतरावर एक वाघीण बसलेली दिसली. त्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली आणि घनदाट जंगलातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, याच दरम्यान वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर, ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक नंदकिशोर काळे घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जोवर वनरक्षक व वनपाल यांना सर्वेक्षणाकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही तोपर्यंत त्यांना सर्वेक्षणासाठी बाध्य करू नये, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या प्राणास धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा वनरक्षक व वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिला आहे.


bottom of page