top of page
Writer's pictureMahannewsonline

'या' माजी आमदारानं भाजपला रामराम करत केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश...

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विजय गव्हाणे हे नाराज असल्याचं वृत्त होतं आणि ते लवकरच भाजपला रामराम करतील अशी चर्चा होती. अखेर गुरुवारी विजय गव्हाणे यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपासाठी हा एक मोठा धक्का मानला जात असून गव्हाणे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे परभणीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच फायदा होईल असं बोललं जात आहे.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, परभणी जिल्हा हा प्रागतिक विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते तयार झाले, त्यापैकीच एक आक्रमक नेतृत्व म्हणजे विजयराव गव्हाणे आहेत, भाजपात ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीपोटी गेले होते. मात्र भाजप हा गोळवलकर यांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या हिताशी भाजपला देणेघेणे नाही. आज परभणीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विजयराव गव्हाणे यांचा पक्षात समावेश होत आहे.विजयराव गव्हाणे हे पुढील काळात भाजपमध्ये गेलेल्या लोकांना हळूहळू पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत आणतील. आज उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात रोज भाजपमधून मंत्री आणि आमदार बाहेर पडून इतर पक्षात जात आहेत. काही दिवसांनी हेच चित्र इतर राज्यातही दिसेल, असेही ते म्हणाले.


bottom of page