top of page
Writer's pictureMahannewsonline

कोविड रुग्णालयाला आग; १३ रुग्णांचा मृत्यू

नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होतं. तर अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे.


मृतांची नावं – १) उमा कनगुटकर २) निलेश भोईर ३) पुखराज वैष्णव ४) रजनी कडू ५) नरेंद्र शिंदे ६) जनार्दन म्हात्रे ७) कुमार दोशी ८) रमेश उपयान ९) प्रविण गोडा १०) अमेय राऊत ११) शमा म्हात्रे १२) सुवर्णा पितळे १३) सुप्रिया देशमुख


गृहमंत्र्यांनी दिले विरार येथील आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाला आपण धैर्याने सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा घटना दुर्दैवी आहेत. या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले आहेत.



bottom of page