top of page
Writer's pictureMahannewsonline

बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे... मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे


पंढरपूर येथे एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार - मुख्यमंत्री शिंदे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी 103 कोटीचा निधी मंजूर

पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात त्यांच्यासाठी आरोग्य सुविधाबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच एक हजार बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच हे बा... विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्याचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.



मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30 टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकवत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे.शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.



विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर केलेले आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीचा एमटीडीसी सोबत असलेला करार पुढेही वाढविण्यात येईल. तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने चार ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले असून आत्तापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.



*मानाचे वारकरी यांचा सत्कार-

शेतकरी बाळू शंकर अहिरे, वय 55 वर्षे, आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे. मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.



Recent Posts

See All
bottom of page