top of page
Writer's pictureMahannewsonline

श्री क्षेत्र औदुंबर येथील झुलता पूल सर्वांचे आकर्षण ठरेल – डॉ.विश्वजीत कदम

औदुंबर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

सांगली : श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. या परिसराला पुराच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटका बसतो, या अनुषंगाने याठिकाणी केलेले बांधकाम भक्कम असले पाहिजे. महापुरात वाढणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन पुलाची उंची जास्त असणे आवश्यक आहे,असे सांगून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून औदुंबर येथे कृष्णा नदीवर उभारण्यात येणारा झुलता पूल हा या प्रकारचा जिल्ह्यातील पहिलाच पूल आहे. त्यामुळे हा पूल सर्वांचे आकर्षण ठरेल. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून पुलाचे डिझाईन तयार करावे , असे निर्देश सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिले .

सन 2017-18मधील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पलूस तालुक्यातील औदुंबर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते आणि खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात झाले . यावेळी तहसीलदार निवास ढाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, गट विकास अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सुरेंद्र वाळवेकर, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील, जेके जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. भूमिपूजन झालेल्या विकास कामांमध्ये श्री क्षेत्र दत्त देवालय औदुंबर येथे कृष्णा नदीवर झुलता पूल , मंदिर परिसरात वाहन स्थळ या कामांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, श्री क्षेत्र औदुंबर येथे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यादृष्टीने येथील रस्ते मोठे व रुंद असणे आवश्यक आहे . तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची चांगली सोय व्हावी , यासाठी येथील जुने गेस्ट हाऊस निर्लेखित करून अद्ययावत नवीन गेस्ट हाऊस बांधण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला. अंकलखोप मुख्य चौकापासून औदुंबर देवस्थाना पर्यंत नागरिकांना येण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व नागरिकांच्या मागणी नुसार भारती विद्यापीठातर्फे दोन इलेक्ट्रिक गाड्या लवकरच प्रदान करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

खासदार संजय पाटील म्हणाले, श्रीक्षेत्र औदुंबर या ठिकाणी आलेल्या भक्तांची सोय करणे हे आपले लक्ष आहे. भक्तांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधणे सोयीचे होईल. आज ज्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे ती कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करावी. हे काम चांगले होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांच्या 78 व्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सरपंच अनिल विभूते यांनी केले. सूत्रसंचालन आप्पासो पाटील यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.


bottom of page