top of page
Writer's pictureMahannewsonline

... तर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध !

कोरोनाचा संसर्गदर आणि रुग्णसंख्या घटल्याने राज्यात पॉझिटिव्हिटी रेट नुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोलापूर, नागपूर, अहमदनगर, वाशिम, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्य़ांतील सर्व निर्बंध रद्द झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे. मात्र, निर्बंध शिथील झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले टाकण्याचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्याने नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. आपण सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतरचा हा बदल आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील', असे वडेट्टीवार म्हणाले. पुढील आठ दिवसातील परिस्थिती पाहून यासंबंधातील निर्णय घेतला जाईल,” असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट किती आहे आणि ऑक्सिजन बेड्स किती भरलेले आहेत त्या आधारावर स्तर निश्चित करून त्यानुसार सध्या निर्बंध लावले जात आहेत किंवा त्यात सूट दिली जात आहे. मात्र, निर्बंधांमधील ही शिथीलता गर्दीला आमंत्रण देणारी ठरल्याचे पाहायला मिळत असून त्यातून रुग्णसंख्या थोड्याफार प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारची चिंता वाढली आहे.


bottom of page