top of page
Writer's pictureMahannewsonline

‘तौक्ते’नंतर आता ‘यास’ चा धोका; भारतीय हवामान विभागाचा इशारा

तौक्ते चक्रीवादळाचा केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या किनारीपट्टीवर मोठा तडाखा बसला असतानाच आता आणखी एका नव्या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 'यास' चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याचा अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

२१ मेपासूनच बंगालच्या उपसागरातील परिस्थिती धोकादायक असणार आहे.त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. २२ मेपासून हा कमी दाबाचा पट्टा उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होणार असून २२ आणि २३ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशीच पर्जन्यवृष्टी ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाला म्यानमारनं ‘तौते’ हे नाव दिलं होतं. तर ‘यास’ या वादळाला ओमानने नाव दिलं आहे.


bottom of page