top of page

पवनमुक्तासन

सततचे बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि वेळी-अवेळी खाणे यामुळे आतड्यांची लवचीकता कमी होते. म्हणजेच त्यांचे सहजतेने आकुंचन-प्रसरण होत नाही. त्याचा परिणाम म्हणून आतड्यांमध्ये अतिरिक्त वायू साठून राहतो व त्याच्या दाबामुळेच पोट फुगणे, बेचैन होणे, डोके दुखणे किंवा उदरवायू यांची सुरुवात होते. हे टाळण्यासाठी ‘पवनमुक्तासन’ हे अतिशय सोपे, परंतु अतिशय परिणामकारक आसन आहे. एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. तेंव्हा हे दोन्ही संलग्न असल्याने पचन संस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन गरजेचे आहे.

पवनमुक्तासन कसे करावे
⬛ पाठीवर झोपा. दोन्ही पाय जवळ ठेवा, दोन्ही हात शरीराजवळ ठेवा.
⬛ एक श्वास घ्या व तो सोडता सोडता उजवा गुडघा छातीपाशी घ्या. दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून गुडघा पोटावर दाबा.
⬛ पुन्हा एकदा एक श्वास घ्या व तो सोडता सोडता डोके आणि छाती जमिनीपासून वर उचला व तुमच्या हनुवटीचा उजव्या गुडघ्याला स्पर्श करा.
याच स्थितीत काही दीर्घ श्वास घ्या.
⬛ लक्षात ठेवा: प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर गुडघा दोन्ही हातांनी आणखी दाबा. छातीवरील दाब वाढवा. जसा श्वास सोडाल तशी पकड ढिली करा. श्वास सोडता सोडता शरीर जमिनीला टेकवा व आराम करा.
⬛ ह्याच पद्धतीने डाव्या पायाने आसन करा व नंतर दोन्ही पाय घेऊन करा.
⬛ ह्या आसनस्थितीत (दोन्ही पाय घेऊन केलेल्या) वर-खाली व दोन्ही बाजूंना शरीराला ३-५ वेळा झोके द्या व आराम करा.


पवनमुक्तासनाचे फायदे :
⬛ पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात.
⬛ पचनशक्ती सुधारते आणि पोटातील वायू बाहेर निघतो.
⬛ पार्श्वभागातील सांध्यांमध्ये रक्ताभिसरण वाढते व पाठीच्या खालच्या भागाचा ताण कमी होतो.
⬛ बद्धकोष्ठता दूर करते.
⬛ आळस दूर करण्यास मदत करते.
⬛ लठ्ठपणा दूर करण्यास सहायक आहे.

सावधान !
हृदयविकाराचा धोका वाढतोय

आरोग्य टिप्स

बडीशेप खाण्याने होणारे फायदे ...   

निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार

bottom of page