top of page
Writer's pictureMahannewsonline

जिल्हा परिषद अध्यक्षांची गांधीगिरी; कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाजला चहा

कोरोनाचा वाढती रूग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून संसर्ग टाळण्यासाठी जनजागृती, प्रचार व प्रसिध्दीही करण्यात येत आहे. काही लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत असल्याने आता लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घातले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयात आले. कर्मचारी हजेरी लावतात त्या ठिकाणी त्यांनी ठाण मांडून ज्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावले नाहीत त्यांना मास्क लावण्याची विनंती केली. तसेच कामावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चहापानाची सोय करत गांधीगिरी मार्गाने सूचना दिल्या.

त्यानंतर ते सामान्य प्रशासन अर्थ विभाग, महिला बालकल्याण, समाज कल्याण, माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आणि कर्मचाऱ्यांना मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, हात सॅनिटायझर अथवा साबणाने स्वच्छ धुवा अशा विविध सूचना केल्या. तसेच यापुढे कोणताही कर्मचारी अथवा कामानिमित्त मुख्यालयात विना मास्क येणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. याप्रसंगी कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत बुधवारी लेट आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता यापुढे जे कर्मचारी उशिरा, विनामास्क येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना केली.

bottom of page